Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात प्रथमच जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपण विभाग सुरु

 


जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भेट देऊन पाहणी केली

धारणीच्या 22 वर्षीय तरुणावर नेत्र बुबुळ प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

         

अमरावती-येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभाग सुरू झाला असून राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात नुकताच नेत्र प्रत्यारोपण विभाग सुरु झाला आहे. अद्ययावत सुविधा व सुसज्ज उपकरणांनी परिपूर्ण असलेल्या नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभागात रुग्ण दाखल झाल्यापासून तर घरी जाई पर्यंत सर्व सुविधा व निशुल्क उपचार रुग्णांवर करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील  नेत्र रुग्णांसाठी ही  सुविधा निश्चितच उपयोगाची आहे असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पवनीत कौर व मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी आज दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाला भेट दिली. येथील नव्याने सुरु झालेल्या नेत्र बुबुळ प्रत्यारोपण विभाग व त्यासंबंधी प्रक्रियेची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली त्यावेळी  त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, नेत्र विभाग प्रमुख डॉ. नम्रता सोनवणे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. कुणाल वानखेडे, डॉ. दिप्ती उमरे, जिल्हा नेत्रदान समुपदेशक निलेश ढेंगळे, भरत गोयनका, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.संतोष भोंडवे आदी उपस्थित होते.

हा विभाग सुरू झाल्यावर  प्रथमच धारणीच्या टेंबली गावातील  लखन मधू येवले या बावीस वर्षीय तरुणावर  नेत्रतज्ञ डॉ.पंकज लांडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी नेत्र प्रत्यारोपण करण्यात आले. लखन येवले यांना मागील दोन वर्षांपासून दृष्टीदोष होता. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दृष्टी परत प्राप्त झाली व हे जग नव्याने पाहता येत असल्यामुळे आनंदीत असल्याची प्रतिक्रिया लखन येवले यांनी यावेळी दिली. श्रीमती कौर यांनी त्या रुग्णाची भेट घेतली व त्याची वैद्यकीय स्थितीची माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातुन शासकीय रुग्णालयात प्रथमच हा विभाग सुरु झाल्याची व सर्व रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया पुर्णपणे निशुल्क  असल्याची माहीती श्री. निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

घाट, चुरणी येथील रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भेट 

जिल्हा सामान्य रुग्णालयात  मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी भरती मेळघाट, चुरणी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील चार रुग्णांच्या दोनीही डोळयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्व रुग्णांची विचारपुस श्रीमती कौर यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुग्णांना गुलाबपुष्प व भेटवस्तु प्रदान करण्यात आल्या.  रुग्ण व रुग्णांच्या नातलगांच्या भोजन व निवासाची माहीती श्रीमती कौर यांनी यावेळी घेतली. मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातुन येणाऱ्या रुग्णांना वारंवार तपासणी करीता रुग्णालयात येण्याचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना इतर रुग्णांच्या तुलनेत चार ते पाच दिवस जास्त काळ रुग्णालयांत ठेऊन त्यांच्यावर पुर्ण उपचार देण्यात येत असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील बाह्य रुग्ण विभागाच्या नविन इमारतीची पाहणी श्रीमती कौर यांनी केली. रुग्णालयांत उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.

Post a Comment

0 Comments