Ticker

6/recent/ticker-posts

आमदार मिटकरी यांना करायचा आहे बारामतीच्या धर्तीवर शहराचा कायापालट!



मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादीत होणार लढत 

प्रतिनिधी | अकोला =  सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्ये त्यांनी आम्ही करून दाखवला आहे, आम्हाला आमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही, तर तुमचेही शहर आम्हाला चांगलं करायचं आहे, असे म्हणून बारामती शहराचे उदाहरण दिले. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जर नगरपरिषद ताब्यात आली तर बारामती शहराचे ' रोल मॉडेल' अकोल्यात वास्तवात उतरवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे दस्तूरखुद्द मिटकरी शहरातील ज्या परिसरात राहतात तो परिसर सुद्धा त्यांनी झगमगाट करून दाखवला आहे. अखेर मतदारराजा कोणाला कौल देतो हे ३ डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे. 

नगरपरिषद निवडणुकीवर भाष्य करताना आमदार मिटकरी म्हणाले की, विकासाचे रोल मॉडेल म्हणून बारामती शहर हे आदर्श उदाहरण आहे. विकासाची दिशा निश्चित असेल तर शहराचा कायापालट करता येतो. मतदारांनी संधी दिल्यास आपण जिल्ह्यातील शहरांचा सुद्धा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगरपरिषद नगरपंचायतीची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक महिलांनी व युवकांनी खांद्यावर घेतल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अकोट, तेल्हारा, हिवरखेड येथे महायुतीतील मित्रपक्ष भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थेट लढत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भाजप, दादांची राष्ट्रवादी व वंचित या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच

 अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मुर्तीजापुर या चार नगरपरिषदांसाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यामध्ये महायुतीतील भाजप, दादांची राष्ट्रवादी व शिंदे सेना हे तीनही प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरले आहेत. तर महाविकास आघाडीचे काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना पक्ष हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी आघाडीने चारही नगरपरिषदांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेने ज्याप्रमाणे वातावरण ढवळून निघाले त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सभा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि विकासाच्या चर्चेला तोंड फुटले. सध्या जिल्ह्यातील निवडणुकीच्या चर्चेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) व वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments