Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण हाच मानवी जीवनाच्या विकासाचा तरणोपाय आहे-आ.सौ. सुलभाताई खोडके


अमरावती २२ जानेवारी :- अमरावती जिल्ह्याच्या  शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात दिवंगत नेते दादासाहेब गवई यांचे मोठे योगदान असून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत आज संस्थेने केलेली उत्तरोत्तर प्रगती ही उल्लेखनीय आहे. समाजाची  जडणघडण ही सुसंस्कारित व उच्चविद्याविभूषित युवा पिढीवर अवलंबुन आहे. त्यामुळे स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना विधायक कार्यासाठी नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.   दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व एच.एस. व्ही.सी.शामनगर अमरावती येथील सत्र २०२४-२५  मधील वार्षिक स्नेहसंमेलन  मोठ्या थाटात संपन्न  झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
     संस्थेच्या अध्यक्षा सौ किर्तीताई अर्जुन तर विशेष अतिथी म्ह्णून अमरावतीच्या निर्वाचित आमदार सौ सुलभाताई खोडके , उदघाटक म्ह्णून  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती निखिल मानकर तसेच  संस्थेचे सचिव डॉ कमलाकर पायस, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आशिष देशमुख  प्रशासकीय अधिकारी सचिन पंडित, संस्थेचे शाळा निरीक्षक  निलेश देशमुख, अमरावती मनपा अभियंता नितिन बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्मुतीशेष रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. पुढे बोलतांना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शिक्षणच आजच्या मानवी जीवनाच्या विकासाचा तरणोपाय आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,   शिक्षणातून व्यक्ती डोळस होत असून जीवन समृद्ध बनणार आहे. आज शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्चविद्याविभूषित होऊन आपले ज्ञान, कौशल्य व विद्वत्तेचा वापर समाजाचे हित व देशाच्या प्रगतीसाठी करावा. असे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.   यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या अध्यक्ष सौ. कीर्तीताई अर्जुन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बदलत्या युगात विद्यार्थ्यांनी अपडेट राहून शिक्षणासोबतच अनेक तांत्रिक व डिजिटल कौशल्य आत्मसात करावे, अंगीभूत कला गुणांचा विकास करून त्याला करियर व रोजगाराची जोड  द्यावी. आज प्रत्येक क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे संधीचे सोनं करण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्षमता निर्मिती व व्यक्तीमत्व विकासाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. अशा शब्दात संस्थेच्या अध्यक्ष कीर्तीताई अर्जुन यांनी मार्गदर्शन केले. तसेच  आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शाळेच्या परिसरात रंगीत पेविंग ब्लॉक त्यांच्या निधीतून बसवून दिल्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने  आमदार महोदयांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमाचे उद्घाटक श्री निखिल मानकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व वर्ग १०  व १२ वी शालांत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपी मुक्त अभियानाची सर्वांना शपथ दिली. तसेच आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.  स्नेहसंमेलना मध्ये वर्ग ५ ते १२  च्या च्या तब्बल २५  चमूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला,त्याचबरोबर एक उत्कृष्ठ नाटिका सुद्धा सादर करण्यात आली.. वर्ग ७ ची विद्यार्थिनी श्रावस्ती हिने उत्कृष्ठ कविता सादर केली.  स्नेहसंमेलना अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमास विद्यालय तथा महाविद्यालयांतील सर्वश्री चापके सर, कचवे सर, नांदूरकर सर,श्री खोडे सर,श्री ठाकरे सर, तसेच कु. गावंडे,सौ.नागठाणे,सौ बोरे  कु.मळसने,कु.लव्हाळे,पालक प्रतिनिधी सौ. रिताताई मंडले, किशोर भुयार ,किशोर देशमुख,  सौ. नेहा चव्हाण,  अतुल जगताप, श्री काळे, श्री मनोहरे व सौ सारिका ताई इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षिका कु.लव्हाळे मॅडम तसेच वर्ग 7 मधील विद्यार्थिनी कु. निशा,ईशिका व लक्षिता यांनी उत्कृष्ठ संचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक   किशोर चापके सर यांनी केले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments