Ticker

6/recent/ticker-posts

विभागाच्या दिमतीला मिळालेले लसीकरण वाहन धूळखात



अमरावती- जिल्ह्यात लसीकरणाच्या कामाला अधिक वेग यावा म्हणून महापारेषण कंपनीने जिल्ह्याला १८ चारचाकी वाहने दिल्यामुळे २६ ऑगस्ट रोजी ही वाहने आरोग्य यंत्रणेत कार्यरत झाली. शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महापारेषणने अमरावती जिल्ह्यासाठी दिलेल्या १८ वाहनापैकी १४ तालुक्यांना प्रत्येकी एक वाहन आणि जिल्हास्तरावर चार अशाप्रकारे सर्व लसीकरण वाहने वितरित करण्यात आली आहेत. मोर्शी तालुक्यामध्ये सदर वाहन प्राप्त झाल्यामुळे लसीकरणाच्या कामाला अधिक गती प्राप्त होईल व लसीकरणाचे काम आटोपल्यानंतर भविष्यात हे वाहन रुग्णवाहिका म्हणून उपयोगात आणले जाणार अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांना होती.

       आरोग्य विभाग आधीच रिक्त पदामुळे ऑक्सिजनवर असतांना मोर्शी तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास अनेकदा अडचणी निर्माण होतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मोर्शी तालुक्याकरिता लसीकरण वाहन पाठवण्यात आले आहे. मागील दोन महिन्यापासून मोर्शी तालुक्यातील लसीकरण वाहन उपजिल्हा रुग्णालयाच्या खुल्या जागेत धूळखात पडले आहे.  स्थानिक आरोग्य विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे मात्र हे लसीकरण वाहन धूळखात पडले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून पाठवलेल्या लसीकरण वाहनाचा फायदा केव्हा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करतांना दिसत आहे.

    मोर्शी तालुक्याला हे लसीकरण वाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आले. वाहन चालकांच्या नियुक्त्या करून लसीकरणाची मोहीमसुद्धा राबविल्या गेली. आरोग्य अधिकाऱ्यांनी या वाहनांवरील चालकांच्या नियुक्तीचे तसेच अन्य नियोजनाचे अधिकार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे तरीसुद्धा मोर्शी तालुक्यातील अनेक दिवसांपासून धूळखात पडलेले लसीकरण वाहन हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका म्हणून उपयोगात आणण्याची मागणी मोर्शी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments