Ticker

6/recent/ticker-posts

नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांचा अजब ‘करिश्मा’



जाहिरात वितरणात जंगी घोळ, शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी


 बेजबाबदार कर्तव्य पालन


सामान तत्व व रोस्टर पद्धतीला ठेंगा


जाहिरात वितरणात हलगर्जीपणा

अमरावती (प्रतिनिधी):  भातकुली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी प्रशासकीय कारभारात अनागोंदी चालविली आहे.  वृत्तपत्रांना प्रसिद्धीस देण्यात येणाऱ्या जाहिरात वितरणात शासनाचे दिशानिर्देश धुडकावून जंगी घोळ व अनियमितता करण्यात आल्याने त्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी दैनिक विदर्भ मतदारचे सहसंपादक अक्षय एडतकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, आयोग, महामंडळ, प्राधिकरणे, शासन पुरस्कृत सहकारी संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद इत्यादी कार्यालयांना महाराष्ट्र  शासनाच्या नियमावलीनुसार त्या त्या वर्गातील वृत्तपत्रांनामध्ये रोस्टर पद्धतीने तसेच समसमानतेच्या तत्वानुसार जाहिरात वितरण करावे या धोरणाचा कटाक्षाने अंमल करावा, असे निर्देशित करण्यात आले आहे. भातकुली नगरपंचायत कार्यालयाने १ जानेवारी २०१९ ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमावली धुडकावून काही विशिष्ट वृत्तपत्रांना जाहिरातीचे वितरण व उर्वरित वर्तमानपत्रांवर अन्याय केलेला आहे. भातकुली नगरपंचायतीने या विहित कालावधीत केलेल्या या अन्यायी कारभाराची जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात यावी व करिष्मा वैद्य यांनी कामात कसूर, बेजाबदारपणे कर्तव्य पार पाडल्याबाबत, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलींचा भंग केल्याप्रकरणी शिस्त व अपील १९७९ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी तक्रार दैनिक विदर्भ मतदारचे सहसंपादक अक्षय एडतकर यांनी गतवर्षी ३० नोव्हेंबरला नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांकडे केली होती.

दरम्यान माहितीच्या अधिकारान्वये जाहिरात वितरणाबाबत भातकुली नगरपंचायतला माहिती मागण्यात आली असता, नगरपंचायतने स्थानिक जाहिरात एजन्सीमार्फत जाहिरातीचे नियमबाह्य पद्धतीने वितरण केल्याचे समोर आले. संबंधित जाहिरात एजन्सी ही वर्तमानपत्रांच्या जाहिरात देयकातून १५ टक्के कमिशन कपात करून देयक अदा करीत आहे. जाहिरात देयकातील कमिशनचा विनाकारण भुर्दंड वर्तमानपत्रांना पडत आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत व खाजगी जाहिरात एजन्सी यांच्यात कोणत्याही शासन निर्णयानुसार- नियमावलीनुसार कुठल्याही प्रकारचा करार होऊ शकत नाही असे असताना देखील मुख्याधिकारी यांनी खाजगी जाहिरात एजन्सीशी संगनमत करून जाहिरात वितरण केले. भातकुली नगरपंचायततर्फे जाहिरात वितरणात करण्यात आलेली अनियमितता तसेच खाजगी जाहिरात एजन्सीची चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या सुचनेनुसार नगरविकास शाखेतर्फे सहायक आयुक्त गिता वंजारी यांनी मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना मुद्देनिहाय खुलासा आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. याकामी अनियमितता, दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, हि बाब प्रशासकीय दृष्ट्या गंभीर स्वरूपाची आहे, असे पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले होते. त्या पत्राला मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी केराची टोपली दाखविल्याने निर्धारित कालावधीनंतर प्रथम व दुसरे स्मरणपत्र दिले; मात्र त्यालासुद्धा मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी सेवा शिस्तभंग करीत ठेंगा दाखविलेला आहे. मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांच्या या गैरकारभाराला नेमका वरदहस्त कुणाचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक, विभागीय आयुक्त पियुष सिंग व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना सदर निवेदन कारवाईस्तव अक्षय एडतकर यांनी दिले आहे.


खुलासा लवकरच करणार

भातकुली नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे खुलासा करणे शक्य झालेले नाही; मात्र आता निवडणूक प्रक्रिया आटोपलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागितलेला खुलासा लवकरच सादर केला जाईल.

- करिश्मा वैद्य, मुख्याधिकारी भातकुली नगरपंचायत

Post a Comment

0 Comments