Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता पहिली ते चौथी शाळा सोमवारपासून सुरू



अमरावती- कोविड- 19 रूग्णसंख्येत घट झाल्याने पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेच्या व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रसूत केलेल्या सर्व सूचनांचे शाळा व्यवस्थापनांनी काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही कोविड अनुरूप वर्तणूक ठेवून कोरोनाचा समूळ नायनाट होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

                       

कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट, तसेच कोरोना रुग्णसंख्येबाबतचा पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाल्याने इयत्ता पहिली ते चौथी शाळा सोमवार, दि. 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केला. आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील परिशिष्ट अ व ब या दोहोंतील सूचनांचे पालन शाळांनी करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेवेळी सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी, तसेच भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्कात येतील याची दक्षता घ्यावी. इयत्ता 1 ते 4 थीचे वर्ग सुरु असताना कुणालाही कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल व आरोग्य विभागाशी संपर्क करून संबंधितांना तत्काळ उपचारासाठी स्थानिक रूग्णालयात न्यावे, असे आदेशात नमूद आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

शाळांकडून अटी व शर्तींचे पालन होते किंवा कसे, याबाबत महानगर क्षेत्रासाठी महापालिका शिक्षणाधिकारी, तसेच ग्रामीण भागासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी राहील. कुठलीही अनियमितता व उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास तत्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश दि. 21 फेब्रुवारीपासून संपूर्ण अमरावती शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लागू आहेत.

शाळांना आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बंधनकारक आहेत. त्यात हात धुण्याची व्यवस्था, तापमापक, जंतूनाशक, साबण आदी उपलब्धता, इमारतीचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी वाहतूकीच्या वाहनांचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. शिक्षक व कर्मचा-यांनी, स्कूल व्हॅनचालकाने दोन्ही लसी घेतलेल्या असणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत एका बाकावर एक विद्यार्थी अशी व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतर असावे. विद्यार्थ्याचे नाक व तोंड मास्कने झाकलेले असावे. तशी सूचना मुलांना वेळोवेळी द्यावी. त्याच्या मार्गदर्शक सूचना फलकावर लावाव्यात. स्नेहसंमेलन आदी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत. पालक- शिक्षक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. आजारी असलेल्या किंवा लक्षणे असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात. शक्य असल्यास वैद्यकीय मदत कक्ष असावा. स्थानिक डॉक्टरांची मदत घ्यावी.

जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. दर दिवशीच्या दोन सत्रांमध्ये योग्य कालावधी असावा. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व जाण्यासाठी शक्यतो स्वतंत्र प्रवेशद्वार असावे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गांकरिता जेवणाची सुट्टी नसेल, आदी बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोविड- 19 रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने 1 ते 4 शाळा प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे, नागरिकांनीही नियमपालन करून  कोरोना साथीचा समूळ नायनाट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जिल्हाधिकारी श्रीमती कौर व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments