Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना संरक्षण

अनाथ बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स स्थापन  



अमरावती-कोविड प्रादुर्भावाच्या काळात, तसेच साथीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हा कृती दल (टास्क फोर्स) स्थापण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकताच जारी केला.


कोविड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात दल स्थापन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार शासन निर्णयही यापूर्वीच जारी करण्यात आला.  


जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.


दोन्ही पालक बाधित असल्यास माहिती द्यावी

ज्या बालकांचे दोन्ही पालक बाधित आहेत, अशा बालकांची माहिती चाईल्डलाईन क्रमांक 1098 किंवा कृती दल समन्वयक यांच्या 9021358816 किंवा बालकल्याण समिती 9422917914 , तसेच हेल्पलाईन क्रमांक 8308992222 व 7400015518 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अशा बालकांची व्यवस्था महिला व बालविकास विभागाच्या देसाई लेआऊटमधील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, तसेच विजय कॉलनीतील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह येथे किंवा कॅम्प रस्त्यावरील होलिक्रॉस होम फॉर बेबीज येथे करण्यात येणार आहे. याची माहिती हॉस्पिटल व्यवस्थापनाने बालकांच्या पालकांना द्यावी. याबाबत सर्व रूग्णालयांनी वेळेत माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


कोविडमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले आहेत, अशी बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी व अनाथ बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments