Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्य प्रेरणा युवाराष्ट्र विशेषांकाचे रंगारंग सोहळ्यात प्रकाशन


अकोला- 
अकोला, अमरावती, बुलडाणा येथून एकाचवेळी प्रकाशित होत असलेल्या विदर्भदूत वृत्तपत्र समूहातर्फे स्वराज्य प्रेरणा युवाराष्ट्र विशेषांक माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आला. गोरक्षण रोड स्थित एम एस ई बी सहकारी पतसंस्थेच्या अभियंता भवन मध्ये रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला. युवाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते डाॅ. निलेश पाटील हे सदर अंकाचे अतिथी संपादक होते. तर मार्गदर्शक म्हणून विदर्भातील सर्वात मोठ्या ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. विनीत हिंगणकर व एम एस ई बी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजिनीयर संतोष खुमकर हे लाभले होते. विशेषांक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी इंजिनियर संतोष खुमकर हे होते तर प्रमुख उपस्थिती अविनाश पाटील नाकट, अजय गावंडे, विलास ताथोड, भारती शेंडे, तुळशीदास खिरोडकर, नरेंद्र चिमणकर, योगेश थोरात, संतोष कुमार टाले, इंजिनीयर प्रवीण राऊत यांची होती.

स्वामी विवेकानंद यांच्या वैचारिक लिखाणसह विविध लेखकांनी माहितीपूर्ण लिखाण सदर विशेषांकात केलेले आहे. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आपल्या लेखणीतून या विशेषांकाच्या माध्यमातून मांडण्याचा परिपूर्ण प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. संतोष हुशे, डॉ. स्वप्ना लांडे, विलास दांडगे, अविनाश पाटील नाकट, तुषार काचकुरे, अभियंता संतोष खुमकर, नितीन धोरण, राजश्री पाटील यांच्यासह साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण लिखाण सदर विशेषांकासाठी केलेले आहे. या सोबतच जिजाऊंच्या लेकी या सदरामध्ये डॉ. नम्रता भागवत, कविता राठोड, सविता अढाऊ, वैष्णवी दातकर, भारती शेंडे, पूजा काळे आदी महिलांच्या कार्य आणि कर्तृत्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.


अतिथी संपादक डॉ. निलेश पाटील यांचे विशेष संपादकीय, ज्वलंत विषयांना हात घालणारे आहेत. प्राचीन शेती आणि आधुनिक शेती यामधील फरक मांडताना त्यांनी सद्यस्थितीतील शेती व्यवस्थापन यावर प्रकाश टाकला आहे. माँसाहेब जिजाऊ यांच्या काळातील अलिखित शेती कायदे, शेती व्यवस्थापन, शेती उत्पादन आणि आजच्या आधुनिक काळातील शेती यातील फरक त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेला हा विषेशांक अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्याभरात चांगलाच कौतुकास्पद पात्र ठरला आहे.

विशेषांक प्रकाशन सोहळ्यादरम्यान डॉ. निलेश पाटील यांनी आजच्या काळात व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, अभिव्यक्ती महत्त्वाची आहे, मग ती अभिव्यक्ती दोन माध्यमातून असते एक तर लिखाण आणि प्रबोधन. लिखाणाच्या माध्यमातून आम्ही समाजात नवा विचार पेरण्याचा, प्रेरणा देण्याचा, स्वराज्य पुन्हा स्थापित करण्याचा, अल्पसा प्रयत्न स्वराज्य प्रेरणा युवाराष्ट्राच्या माध्यमातून केलेला आहे. हा विशेषांक घराघरात वाचला जावा, अंकातील विचार समजून घ्यावे, असे प्रतिपादन यावेळी केले.

आजचा काळ हा प्रचंड धावपळीचा आहे. मोबाईल च्या काळात जो तो अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे स्वराज्य विचार, समाजक्रांतीचे विचार घराघरात पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे काम विदर्भदूत या वृत्तपत्राने जयंतीदिनी विशेषांकाच्या माध्यमातून नक्कीच केलेले आहे, असे प्रतिपादन अविनाश पाटील नाकट यांनी केले. यावेळी विदर्भदूतचे मुख्य संपादक संजय निकास, अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक भागवत मुठ्ठे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल थोरात, दशरथ तावडे, अकोला शहर प्रतिनिधी अक्षय पांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्री नाकट तर आभार विदर्भदूतच्या मुख्य उपसंपादक पूजा महातळे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments