Ticker

6/recent/ticker-posts

मराठीचे संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य -प्रा.अरुण बुंदेले

   "महिला महाविद्यालयात प्रा.बुंदेलेंचे मराठीभाषेवर व्याख्यान "



खामगाव-  " संतांनी विविध अभंगातून व ग्रंथातून मराठी भाषा अमृतमय केली.मराठी भाषेत लिहिणाऱ्या सर्व लेखक कवींनी  कविता,कथा ,

कादंबरी, नाटक, एकांकिका लिहून मराठी भाषा हृदयापासून जपली. जोपासली, फुलवली आणि तिचा वेलू गगनावरी नेण्याचा मनस्वी प्रयत्न केला.  मराठी भाषेची खरी संपत्ती संतांचे अभंग, भारुडे ,साहित्यिकांचे विविधांगी साहित्यलेखन  असून  वाचन संस्कृतीतून व आचरणातून मराठी भाषेचे  संगोपन व संवर्धन मराठी  माणसाने केले पाहिजे.मराठी ही प्राचीन भाषा असून ती राज्यभाषा, ज्ञानभाषा, लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधील अग्रणी भाषा आहे .भारतातील बावीस भाषांपैकी मराठी ही जगात दहाव्या व  भारतात चौथ्या क्रमांकावर आहे .चौपन्न बोलींनी  ती  समृद्ध झालेली असून मराठी ही ७२ देशात व भारतात ३६ राज्यात बोलली जाते.अशा या समृद्ध मराठी भाषेचे संगोपन आणि संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्यकर्तव्य आहे .मराठीच्या संवर्धनासाठी सर्व नोंदी ,टिपणे मराठीत लिहावी,मराठी शब्दसंग्रह,ग्रंथसंग्रह वाढवावा,

घराचे, व्यवसायाचे नाव मराठीत लिहावे, संपर्कात येणाऱ्या सर्वांशी मराठीतच बोलावे ,मराठी नियतकालिके  विकत  घ्यावी.

शुभप्रसंगी मराठी पुस्तके भेट द्यावी ,शुभेच्छापत्रे मराठीत पाठवावी, मराठी  संमेलनात उपस्थित राहावे ,मराठी भाषा संगोपनाचे संवर्धनाचे विविध उपक्रम राबवावे. भाषेच्या संवर्धनासाठी संभाषण,वाचन व लेखन कलेला महत्त्व देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (साहित्यिक,अमरावती) यांनी 

केले. ते खामगाव येथील श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालया मध्ये मराठी विभाग द्वारा आयोजित आभासी पद्धतीने "मराठी भाषा गौरव दिना"निमित्त "मराठी भाषेचे संगोपन आणि संवर्धनाची आवश्यकता" या विषयावर प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.

          " मराठी भाषा गौरव दिनी" संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सौ.स्वाती चांदे मॅडम  व प्रमुख वक्ते प्रा.अरुण  बाबारावजी  बुंदेले (साहित्यिक,अमरावती) होते.

               सर्वप्रथम कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे हारार्पण व पूजन अध्यक्ष प्राचार्य डॉ. स्वाती चांदे यांनी केले .

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय प्रा.डॉ.हेमा जवंजाळ( मराठी विभाग प्रमुख ) यांनी करून दिला.प्रास्ताविक भाषणात त्यांनी ,"मराठी साहित्यविश्वाच्या सारस्वत मंदिरातील दैदिप्यमान रत्नाचा म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची  सुरुवात 'अ 'पासून म्हणजे अज्ञानापासून होते तर शेवट 'ज्ञ' म्हणजे ज्ञानानी होतो "असे प्रतिपादन केले.

  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अरुण बुंदेले यांनी "थोर साहित्यिक वि .वा.शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जीवनचरित्र व समृद्ध साहित्यिक कार्याची माहिती देऊन कुसुमाग्रजांनी मायबोली मराठीची सेवा विविध साहित्यकृतींमधून उत्कृष्टपणे केलेली आहे हे त्यांच्या अनेक काव्यसंग्रहातून ,अनेक नाटकातून,कादंबऱ्यांतून लघुकथेतून,लघुनिबंधातून एकांकिकेतून  केल्याचे प्रतिपादन केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षा  प्राचार्या डॉ.सौ.स्वाती चांदे  यांनी "मराठी भाषेतून माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो मराठी साहित्य हे अत्यंत मधुर व रसपूर्ण असून त्याचा आस्वाद सर्व विद्यार्थिनींनी घेणे आवश्यक आहे.आज मराठी भाषेच्या संवर्धनाची अतिशय गरज आहे कारण मराठी भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी शब्दांची सरमिसळ असल्याचीखंत त्यांनी व्यक्त केली. प्रा.अरुण बुंदेले यांनी मराठी भाषेच्या संगोपन व संवर्धनाविषयी आपल्या ओघवत्या भाषेतून व्यक्त केलेले विचार मराठी भाषा समृद्धी साठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .

            कार्यक्रमात महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,कला व वाणिज्य शाखेच्या बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता प्रा. अरुण बुंदेले यांनी "मराठी भाषा संवर्धन " या स्वरचित  अभंग गायनाने करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

Post a Comment

0 Comments