Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी समाजप्रबाेधनाचा वसा स्वीकारावा- डाॅ. कांचन शेगाेकार

 राज्यस्तरीय महिला प्रबाेधन मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर



अकाेला: स्व बंधनातून मुक्ततेकडे प्रवास करत महिलांनी आता सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. स्व मनाला शिस्त लावून संत-महापुरुष, कर्तबगार महिलांचा समाजप्रबाेधनाचा वसा स्वीकारावा. सकारात्मक ऊर्जेतून महिलांनी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मुंबई येथील प्रवक्त्या डाॅ. कांचन शेगाेकार यांनी केले. अकाेला येथे आयाेजित राज्यस्तरीय महिला प्रबाेधन मेळाव्यात उद्घाटनीय भाषणात त्या बाेलत हाेत्या.


रविदासीय महिला सेवा ग्रुप अकोलातर्फे संत रविदास महाराज यांची जयंती व जागतिक महिला दिनानिमित्त आयाेजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. चित्रा राजुस्कर हाेत्या. समाजाला नवी दिशा देण्यासाठी महिलांनी संघटित हाेऊन लढा द्यावा. त्यासाठी वैचारिकता जाेपासावी, असे प्रतिपादन डाॅ. राजुस्कर यांनी अध्यक्षीय भाषणात केले. उदघाटन साेहळ्याला मीनाताई बुंदेले यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रास्ताविकाद्वारे डाॅ. कल्याणी पदमणे यांनी संघटन काैशल्यातून समाजाची सेवा याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी अमरावती येथील चमूने नृत्य सादर करून कार्यक्रमात अनोखा रंग भरला. प्रबाेधन सत्रात डाॅ. कल्याणी पदमणे, डॉ. प्रफुल्ल वानखडे, प्रा. दुर्गाताई नाचणे, नंदिनीताई गव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या छाया इंगळे, पद्मा ढाकरे, नंदा शेगोकार, कल्पना उंबरकर, शालिनी पदमणे, रत्नमाला गव्हाळे, सुनंदा पदमणे, स्नेहलता राजुस्कर, द्वारकाबाई चापके, सुनंदा भागवतकार, तेजल सोनवणे यांचा गाैरव करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. केतकी काकडे, डॉ. रविकिरण पदमणे, अविनाश उंबरकर यांचे योगदान लाभले. सूत्रसंचालन शरयू धुमाळे यांनी केले तर आभार डॉ. अपर्णा चिमणकर मानले. या कार्यक्रमादरम्यान समाजातील महिलांचे तसेच बचत गटातर्फे आनंद मेळाव्याचे देखील  आयोजन करण्यात आले होते. 


भ्रुणहत्या नाटिकेने वेधले लक्ष 

या शिबिरास  महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित महिलांसह परिसरातील महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मेळाव्याच्या समाराेपीय कार्यक्रमात राज्यभरातील महिलांच्या चमूने  व त्यांच्या पाल्यांनी   एकल व समूह  नृत्याचे सादरीकरण केले. 

यामध्ये  अमरावती येथील  चमूने सादर केलेल्या भ्रुणहत्या   या नृत्य नाटिकेचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. या नृत्य नाटिकेत स्मिता पानझाडे, रश्मी शेगोकार, वर्षा इंगळे, भारती धुमाळे, रसिका पिंजरकर,  ज्योत्सना  ढाकरे, सुषमा मोहोकर, पिंकी  पिंजरकर   या भगिनींनी  सहभाग नोंदविला. अकोला येथील  छाया काकडे, प्राजक्ता  चापके,  डाॅ. अपर्णा चिमणकर, अर्चना इंगळे, दुर्गा नाचणे, श्रद्धा सोनटक्के, कल्याणी पदमणे यांनी ‘नारी शक्ती’ या नृत्य नाटिकेचे यशस्वी सादरीकरण केले.  लहान मुले व मुलींनी या प्रसंगी  केलेल्या उत्कृष्ट   नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment

0 Comments