Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत तब्बल 2053 लोकांना देण्यात आल्या बनावट लसी



मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. परंतू या लाटेचा धोका हा अजूनही कायम आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. 


या पार्श्वभूमीवर कोरोनावर प्रतिबंध म्हणून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र लसीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी अजूनही काळाबाजार होतांना दिसून येत आहे. 


आधी बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले, तर आता बोगस लसीकरण केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतून पुढे आली आहे.


यात तब्बल दोन हजार नागरिकांचे 25 मे ते 6 जून या कालावधीत बोगस लसीकरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत चार एफआयआर नोंदवल्या गेली असून, चारशे साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले आहेत.


अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. 


या लसीकरण मोहिमेसाठी 9 शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबीरांमध्ये हे लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

त्याचबरोबर ज्यांना ही बनावट लस देण्यात आली, त्यांच्या प्रकृतीबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. 


पुढच्या वेळी अशा प्रकारांना चाप लावणारा ठोस आराखडा प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. 


या प्रकरणातील आरोपींनी बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, खार, लोअर परळ अशा विविध ठिकाणी एकसारख्याच पद्धतीने बोगस लसीकरणाची शिबिरे घेतली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments