Ticker

6/recent/ticker-posts

आता मुंबईच्या समुद्रातील खारे पाणी होणार पिण्यायोग्य



मुंबई | मुंबईच्या समुद्रातील खाऱ्या पाण्याचे रूपांतर गोड पाण्यात करण्याचे स्वप्न आता खरे होणार आहे. मुंबई महानगरपालिका व आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे मालाड, मनोरी येथील तब्बल 200 दशलक्ष लिटर समुद्रातील खाऱ्या पाण्याचे रूपांतर गोड पाण्यात करण्याच्या प्रकल्पाला अखेर वेग आल्याचे दिसून येत आहे. 


नुकताच पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. या प्रक्रियेत इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, खा-या पाण्याला गोड करण्याचा हा प्रकल्प म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 


यानुसार मनोरी, मालाड येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याद्वारे खाऱ्या पाण्याचे नि:क्षारीकरण करून ते पाणी पिण्यायोग्य बनविण्यात येणार आहे.


इस्रायलचे तंत्रज्ञान हे पाण्याच्या सुरक्षिततेमध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. इस्रायलच्या महावाणिज्य दूतांकडून पाण्याच्या स्रोतांचे सक्षमीकरण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. यासाठी सामंजस्य कराराद्वारे करत असलेल्या या उपक्रमाची अधिक माहिती देण्यात आली आहे. 


याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाचे महत्त्व समजून घेत, नि:क्षारीकरण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच जगातील काही देशांनी यापूर्वीच समुद्राचे पाणी तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड करून वापरण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


सध्या 200 दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या या प्रकल्पाची, भविष्यातील क्षमता 400 दशलक्ष लिटर वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments