Ticker

6/recent/ticker-posts

बिकट परिस्थितीशी झुंज देत बनला तलाठी; समाजऋण फेडण्यासाठी 10 गावांमध्ये सुरु करतोय अभ्यासिका!बुलडाणा | समाजासाठी जगणारी ध्येयवेडी माणसं समाजात सतत बदल घडवून आणण्यासाठी धडपडत असतात. सध्या लग्नसमारंभात उथळपणे खर्च करण्याची पद्धत असतांना हातनी येथील गजानन जाधव यांनी स्वतःचा विवाह अगदी साधेपणाने विधायक विधी करून संपन्न करायचं ठरवलं आहे.


28 फेब्रुवारी ला गजानन जाधव यांचा विवाह कोलारा येथे संपन्न होणार आहे. त्या निमित्त चिखली तालुक्यातील 10 गावांमध्ये स्वखर्चातून अभ्यासिका उभारण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे. 


घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असणाऱ्या गजानन यांचे पितृछत्र ते लहान असतांना हरवले. तरीही जिद्द आणि अभ्यासवृत्तीच्या जोरावर त्यांनी एप्रिल 2016 मध्ये तलाठी या पदावर रूजू झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे ते सध्या कार्यरत आहेत. 


गजानन यांचे तीन बहिणी आणि आई असा हे कुटूंब आहे. त्यांच्या आईने शेती आणि मजुरी करून सर्वांना शिक्षण दिले. तिन्ही मुलींचे लग्न केले. शिक्षणासोबत घरी हातभार लावण्यासाठी गजानन यांनी चिखली येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम केले. डीएड नंतर बी.ए. चे शिक्षण आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी, असा जोखीम प्रवास करणाऱ्या गजानन यांच्या संघर्षाला 2016 साली यश आले. 


तलाठी म्हणून रूजू झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या प्रत्येक महिन्याच्या पगारातील 50 टक्के खर्च ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करत आहेत. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांच्या कार्यातून कायम दिसून येत आहे. मार्च 2018 मध्ये आपल्या बहिणीच्या विवाहानिमित्त 1 लाख रुपयांची पुस्तके त्यांनी कोलारा येथील अभ्यासिकेला आंदण स्वरूपात दिली. यासोबतच गोद्री आणि भोकर येथील अभ्यासिकेला सुद्धा पुस्तके दिली.


त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना ज्या-ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या समस्या ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी कामगारांच्या मुलांवर येऊ नये यासाठी गाव तिथे अभ्यासिका हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. 


खेडेगावात राहणा-या प्रत्येक मुलाला अभ्यास करण्यासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी विवाह प्रसंगी होणारा व्यर्थ खर्च बाजूला सारून दहा गावांमध्ये अभ्यासिका तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. 


त्यापैकी दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद येथील अभ्यासिकांचे कामही पूर्ण झाले आहे. अशा या धेय्यवेड्या, सामाजिक बांधिलकी जपणा-या व्यक्तीकडून अनेक गरीब कुटूंबातील मुले ज्ञानाच्या प्रकाशाकडे झेप घेतांना दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments