Ticker

6/recent/ticker-posts

अखेर ‘स्पुटनिक वी’ लसीची प्रतिक्षा संपली, या तारखेपासून मिळणार



पुणे | रशियाने विकसित केलेली स्पुटनिक वी लस ज्यावेळी भारतात आली होती, त्याआधी भारतात फक्त कोवाॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती. 


परंतू आता मात्र रशियाच्या स्पुटनिक वी या लसीच्या वितरणाला देशात परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही स्पुटनिक लस आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.


या लसीचे वितरण हे देशात हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत आहे. या लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. 


यातील पहिल्या टप्प्यात या लसीचे 600 डोस पुण्यात उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या फक्त पुण्यात ही लस उपलब्ध आहे. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका 36 वर्षीय व्यक्तीला स्पुटनिकची लस दिल्या गेली आहे. 


ही लस पुण्यात 28 जूनपासून सर्वत्र उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या लसीचे दोन डोस मधील अंतर हे 21 दिवसांचे निश्चित करण्यात आले आहे. 


या लसीची विशेष बाब म्हणजे ही लस अत्यंत प्रभावी असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी तब्बल 92 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


एकूण 55 देशांमध्ये या लसीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळे भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात देखील ही लस यशस्वी ठरु शकते, असे तज्ञांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments