Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चिखली तहसीलदारांना निवेदन


Manoj Jadhao-Chikhali हल्ली अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे व शेतपिकांचे प्रचंड नुकसान होतांना दिसत आहे. त्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यासोबतच त्यांना प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने तात्काळ पंचनामे करून 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आपल्या निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी चिखलीच्या तहसीलदारांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे चिखली तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याआधी ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. अश्यातच जी पिके काढणीसाठी वर आले होते ते पावसामुळे उद्ध्वस्त झाले. आता सुद्धा शेतक-यांच्या तोंडाशी असलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावून गेला आहे. कधी कोरोना लाॅकडाऊनमुळे तर कधी बोगस बियाणे आणि खतांच्या तुटवड्यामुळे शेतक-यांना त्रास सहन करावा लागला आहे. परंतु यंदा मात्र चांगले पिक येऊनही अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी यांसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर करण्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

Post a Comment

0 Comments