Ticker

6/recent/ticker-posts

जनसामान्यांच्या काळजातील राजकारणी!

Balmukund Bhirad Prakash Ambedkar

अकोला जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव म्हणजे बालमुकुंद भिरड! जिल्हा परिषद अकोलाचे माजी अध्यक्ष. नवोदित उद्योजकांना प्रेरणा देणारे, मार्गदर्शनाचा हात प्रत्येकाच्या पाठीेवर ठेवणारे यशस्वी उद्योजक. महत्त्वाचे म्हणजे स्वाभीमानी आणि कणखर नेतृत्व असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय. या सर्व गोष्टी असताना अभिमानाचा लवलेशही त्यांनी आयुष्यभर जवळपास फिरकू दिला नाही. स्वता:मध्ये अहंकार निर्माण होऊच दिला नाही. शेती आणि मातीशी असलेली नाळ, उद्योजकतेची असलेली कास, आणि अगदी तळागाळातील सामान्य जनमानसांपर्यंत असलेले संबंध तूटू दिले नाही किंवा कमी होऊ दिले नाहीत. सर्व कार्यकत्र्यांविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम त्यांनी आज पर्यंतच्या उभ्या हयातीत कधीही कमी होऊ दिले नाही.
शेतीमित्र पुरस्कार प्राप्त करुन, सधण कास्तकार म्हणून उद्यास आल्यावर  आजही ते तळागाळातील शेतक-यांच्या हीतासाठी कायम आपलं आयुष्य झिजवित आहेत. खरं पाहिलं तर माणूस 'राजकीय झाल्यावर व अशस्वीतेच्या पाय:या चढत गेल्यावर  मागे वळून पाहतांना फारसा दिसत नाही. सामान्यांच्या ब-याच गोष्टी तो टाळत असल्याचे  अनेक राजकीय उदाहरणांवरुन दिसून येते. आपल्याला वेळोवेळी याचा अनुभवही येतो; परंतु बालमुकुंद भिरड यांनी यशाच्या पाय-या चढत असताना सामान्यांशी असलेले प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही. आपण ज्या  ठिकाणावरून आलो, ज्या  सामान्य माणसांमधून आलो, त्या सर्वांविषयीची आपुलकी तिळमात्र सुद्धा कमी होऊ दिली नाही. आजवर उद्योजक, शेतकरी आणि राजकारणी म्हणून  कार्य केले असले तरीही राजकारण करीत असताना त्यांनी जास्तीत जास्त समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. जनसामान्यांच्या व्यापक हीतासाठी, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाण्याची त्यांची सवय तिळमात्र सुद्धा आजही कमी झालेली नाही. भिरड ब्रदर्स इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक म्हणून, महाराष्ट्र शासनाचा लघुउद्योजक पुरस्कार त्यांना मिळाला ही त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेची जणू एक पावती म्हणावी लागेल. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सोयूज टीव्हीचे निर्माण केले हे विशेष! आणि राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर अकोला जिल्हा परिषदेची अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. अनेक नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम जिल्ह्याला दिले.
                   १५ ऑगस्ट १९६३ ला बालमुकुंद भिरड यांचा जन्म झाला. तेली समाजामधून आलेले हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण राज्यात ओबीसी बांधवांसाठी तळमळीने झटत आहे. ओबीसींचे नेतृत्व करीत आहे. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर डिसेंबर १९९६ मध्ये खरीप संकरित ज्वारी तालुका पीक स्पर्धेत अकोला तालुक्यात त्यांनी प्रथम पुरस्कार मिळविला.  डिसेंबर 1996 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा आयोजित फळे भाजीपाला व पुष्प प्रदर्शन, गुलाब पुष्प यामध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक त्यांनी मिळविले. जुलै १९९८ मध्ये हरित क्रांतीचे जनक व तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनी स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात तत्कालीन  जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मुकुंदराव मेडशीकर यांच्या हस्ते शेतीमित्र पुरस्काराने त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. १९८८ च्या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे सदस्यत्व मिळविले व युवक काँग्रेसचे पश्चिम ब्लॉक अध्यक्ष पदी त्यांनी काम करायला सुरुवात केली. हे करीत असताना विविध उद्योग संमेलनात भाग घेऊन नवीन युवक उद्योजकांना प्रोत्साहन आणि चालना दिली. त्यांना व्यावसायिक बनविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. शेकडो यशस्वी उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे केल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला. व युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस रिपाईचे अधिकृत उमेदवार यांच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी स्वत:च्या मंगल कार्यालयात स्व:खर्चाने भव्य निवडणूक सभा घेतल्या. तेली समाज व इतर ओबीसी जसे कुंभार, भोई, शिंपी, सोनार, गोंधळी, सुतळी, नाथ, जोगी, गोवारी, लोहार व इतर बहुजन समाजाच्या कार्यकत्र्यांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे केले.  विविध जाहीर निवेदनेही प्रसिद्ध केली. आणि सर्वांच्या मेहनतीने विजयश्री खेचून आणल्या गेला. आणि येथूनच पुढे १९९९ मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकत्र्यांसह त्यांनी  भारिप बहुजन महासंघामध्ये जाहीर प्रवेश घेतला. शेती, उद्योग आणि राजकारण करीत असताना त्यांनी वेळोवेळी विविध ठिकाणी नेतृत्वही केले. विविध पदंही भूषविली. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावयचा झाल्यास, अध्यक्ष ओबीसी महासंघ अकोला जिल्हा, संचालक दि अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जुनेशहर अकोला, कार्यकारी व अजीवन सदस्य अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन, कार्यकारी सदस्य विदर्भ टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन नागपूर, जिल्हाध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ अकोला, अध्यक्ष श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ अकोला, कोषाध्यक्ष स्वर्गीय विनयकुमार पाराशरजी शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यक्ष शिवा दल व्यायामशाळा डाबकी रोड अकोला, तांत्रिक सल्लागार टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर ग्रामपंचायत उमरी, आश्रयदाता, ऑल इंडिया आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली. सदस्य विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स. आदी  विविध पदांवर त्यांनी काम केले व करीत आहेत.
                  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या  स्वाभिमानी नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्यासोबत काम करीत असताना बालमुकुंद भिरड यांनी विविध नाविन्यपूर्ण आणि समाजाच्या व्यापक जनहिताचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत.  अनेक गोष्टी त्यांनी आतापर्यंत समाजहिताच्या पूर्ण केलेल्या आहेत.  संपूर्ण ओबीसींसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. अशा या बहुआयामी नेतृत्वाला, जनसामान्यातील राजकारणी व्यक्तीमत्त्वाला 'विदर्भदूत तर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
लेखक-संजय निकस पाटील
--------
सदर लेख १९ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments