Ticker

6/recent/ticker-posts

आयुष्मान भव मोहिमेत आबालवृध्दांची आरोग्य तपासणी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

VIDHARBAdoot photo


बुलडाणा- जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान आयुष्मान भव आरोग्य मोहीम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी या मोहिमेंतर्गत आबालवृद्धांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आयुष्मान आपल्या दारी ३.० या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्य विषयक सेवासुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्डबाबत आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. यात असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळाव्यांतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा आदीबाबत जनजागृती करणे आणि आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर दर आठवड्याला सलग चार आठवडे तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा तसेच योगा, वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी व टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीतील मुले आणि प्राथमिक शाळेतील मुलांची आरोग्यविषयक तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांची ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मुलांवर जिल्हा ठिकाणी शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्यही देण्यात येणार आहे. आयुष्मान भव मोहिमेचा जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments