Ticker

6/recent/ticker-posts

कृषी विद्यापीठाच्या कायम ऋणात राहील :- IAS प्रल्हाद शर्मा

 


 समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून देशसेवा करावी :- कुलगुरू डॉ. विलास भाले

 कृषी महाविद्यालय अकोलाचा विद्यार्थी म्हणून जे शिक्षण संस्कार आणि प्रेम मिळाले ते आजन्म विसरू शकणार नाही या भावनिक वाक्यासह विद्यापीठाच्या ऋणातच राहत देशसेवा करण्याचा संकल्प नुकतेच भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) घवघवीत यश प्राप्त केलेल्या श्री प्रल्हाद मांगीलाल शर्मा यांनी व्यक्त केला. डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय अकोला येथून सन 2014 साली  कृषीची पदवी प्राप्त केलेल्या मुळच्या राजस्थान राज्यातील जयपुर जिल्ह्यातून शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रल्हाद शर्मा यांनी भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत देशपातळीवर 104 व्या स्थानी येत घवघवीत यश प्राप्त केले. त्यांच्या सन्मानार्थ डॉ.  पंजाबराव देशमुख कॉम्पिटिटिव्ह फोरम (PDCF) द्वारे आयोजित सत्कार सोहळ्यासाठी अकोला येथे त्यांच्या आगमन झाले होते. आज विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे अध्यक्षतेत विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालयातील सभागृहात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला त्याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते. वडील शेतकरी असल्याने शेती विषयात सुरुवातीपासूनच सांगत श्री शर्मा यांनी कृषी विषयातच पदव्युत्तर शिक्षण भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथून प्राप्त व तदनंतर भारतीय प्रशासकीय सेवेच्या अभ्यासक्रमात सुद्धा कृषी हा विषय मुद्दामून निवडल्याचे उपस्थितांना अवगत केले. शेती व शेतकरी हित साधण्यात आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा लौकिक कायम राखू असे भावोदगार देखील श्री प्रल्हाद शर्मा यांनी याप्रसंगी काढले.  तर आपल्या कृषिप्रधान देशांमध्ये कृषीचे शिक्षणच सर्वोच्च स्थानी असावे आणि कृषी पदवीधरांनी शेती व्यवसायाच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करावे असे आवाहन कृषी पदवीधरांना करतांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपले अध्यक्ष मनोगतात भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्री प्रल्हाद शर्मा यांचे भरभरून कौतुक केले व आपले माध्यमातून विद्यापीठातील इतरही विद्यार्थ्यांना देशांतर्गत तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याची प्रेरणा निश्चितच प्राप्त होईल व नोकरी, रोजगार तथा स्वयंरोजगाराचे माध्यमातून शेती आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी बळ मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. ग्रामीण भागाशी असलेली आपली नाळ कायम राखत समाजाप्रती आपलं काही देणं लागतं ही भावना प्रत्येकाने कायमच आपले स्मरणात ठेवावी व त्यानुसार आपले कार्य प्रणाली स्वीकारावी असे भावनात्मक आवाहन देखील कुलगुरू डॉ.  विलास भाले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ  राजेंद्र गाडे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगि अधिष्ठाता शिक्षण डॉ. नितीन कोष्टी यांचे सह कुलगुरू कार्यालयाचे इतर अधिकारी कर्मचारी तथा  विद्यार्थी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

Post a Comment

0 Comments