Ticker

6/recent/ticker-posts

दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, युवकाने स्वत:चाही चिरला गळा

 


यवतमाळ- शहरातील दारव्हा मार्गावरील लोहारा एमआयडीसी परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. पॉवर हाऊसमागील भागात एक युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तडफडताना दिसला. याची माहिती लोहारा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्या युवकाने स्वत:च्या प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केल्याचे सांगितले व नंतर तो बेशुद्ध झाला. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी सकाळी १0.३0 वाजता दरम्यान घडली.

आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा, असे मृत मुलीचे नाव आहे. तर शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. शुभम हा वडिलाची दुचाकी एमएच-२९-बीएम-३१४६ ने लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचला. त्याने सोबत आस्थाला घेतले. दरम्यान, या झुडपीवजा जंगलात दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला, हे स्पष्ट नाही. या वादात संतापलेल्या शुभमने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे आस्थाच्या चेहर्‍यावर दगडाने घाव घातले. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली. नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला.


 रक्ताच्या थारोळ्यात तडफडत शुभम झुडपीवजा जंगलातून मुख्य रस्त्यावर आला. तेथे तो योगेश यादव नामक व्यक्तीला दिसला. योगेशने तत्काळ याची माहिती लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी शुभमला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. तर आस्था ही जागेवरच गतप्राण झाल्याचे आढळून आले.

सुरुवातीला प्रेमीयुगुलावर कुणी हल्ला तर केला नाही ना, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, परिसरातच आरोपी शुभमची दुचाकी आढळून आली. शिवाय आस्थाच्या जवळ तिच्या शाळेची बॅग व इतर कागदपत्रेही त्यात आढळून आले. यावरून दोघांची काही तासांच ओळख पटली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुभमविरोधात कलम ३0२, ३0९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोहारा पोलिस ठाण्यात सुरू होती.

Post a Comment

0 Comments