बारामती | येथील माळेगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या थराराने चांगलीच खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या रविराज यांना तातडीने बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे ते पती आहेत. दोघेही पती पत्नी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते.
वडापाव घेऊन आपल्या गाडीकडे परत येतांना, बेधडकपणे दुचाकीवर येत असलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीररित्या जखमी होऊन रविराज जमिनीवर कोसळले. रोहिणी यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच क्रिकेट खेळत असलेली मुले त्यांच्या मदतीसाठी धावली.
सर्वांच्या मदतीने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी खास पुण्याहून डाॅक्टरांची टीम बोलवण्यात आली असून उपचार सुरू आहे.
रविराज हे माळेगावमधील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.


0 Comments