Ticker

6/recent/ticker-posts

एका व्यक्तीला एकाच दिवशी कोरोना लसीचे दोन डोस दिल्याने खळबळ



लखनऊ | मागील वर्षापासून जगभरात कोरोनाने अनेक कुटूंब उध्वस्त केली आहे. यामध्ये भारतात 3 लाखांहून जास्त लोकांना जीव गमवावा लागला. कोरोनावर मात करण्यासाठी आता लस देखील उपलब्ध झाली आहे. त्यानुसार सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. अत्यंत काळजीपूर्वक नागरिकांना ही लस दिली जात असतांना, एका लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडल्याची बाब पुढे आली आहे. 


या घटनेत एका व्यक्तीला एकाच दिवशी लसीचे चक्क दोन डोस दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यात हा विचित्र प्रकार घडला आहे. येथील रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले आहे. 


आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप या व्यक्तीद्वारे करण्यात येत आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून नेमकं काय घडलं, यासाठी जबाबदार कोण आहे, यासंदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


त्याचबरोबर झालेल्या चुकीवर पडदा टाकतांना मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याने काहीही नुकसान होत नसल्याचे, स्पष्ट केले आहे.


संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही व्यक्ती लसीकरण केंद्रावर गेली. त्यावेळी त्या केंद्रात असलेल्या नर्स एकमेकांसोबत गप्पा मारत होत्या. त्याचवेळी त्यांनी या व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने लसीचे दोन्ही डोस दिले. 


दोन डोस एकाच वेळी घ्यायचे नव्हते हे, समजल्यावर कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या व्यक्तीने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करून यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments