मुंबई | दिवसेंदिवस देशाची अर्थव्यवस्था ही खिळखिळी होत चालली आहे. गेल्या 40 वर्षाचा रेकाॅर्ड भारतीय अर्थव्यवस्थेने मोडला आहे. यामुळे भारताचा विकास दर हा – 7.3% वर आला आहे. एनएसओने जाहिर केलेल्या आकडेवारीच्या निष्कर्षानुसार भारतीय अर्थव्यवस्था ही नकारात्मक आणि संकटात असल्याचे स्पष्ट झालं आहे.
अर्थव्यवस्था चांगलीच ढासळल्याने अच्छे दिन म्हणत मिरवणा-या आणि खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारवर चहोबाजूंनी टीकेचा वर्षाव होत आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी देखील मोदी सरकारवर निशाना साधत त्यांना सल्ला दिला आहे.
गेल्या 40 वर्षात खालावलेली अर्थव्यवस्था पुन्हा वर नेणे हे एक मोठं आव्हान सरकारपुढे आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी वैयक्तिक मतभेद आणि हट्ट बाजूला सारून देशहितासाठी विरोधी पक्षाचे सर्व नेते, प्रमुख अर्थतज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून सरकारने आर्थिक धोरणं आखायला हवे, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
पक्षीय अजेंडा विसरून देशाला सावरण्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाच्या अधिकाधिक योजना राबवून लोकांच्या हातात पैसा कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे.


0 Comments