Ticker

6/recent/ticker-posts

कुठे गेलं रामदेव बाबांनी आणलेलं कोरोनील...वाचा सविस्तर

Ramdevbaba


रामदेव बाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात ते ऑक्सिजन नाही म्हणणाऱ्या लोकांवर टीका करत होते. 'देवाने संपूर्ण ब्रह्मांड ऑक्सिजनने भरून ठेवला आहे, नाकाच्या रूपात असलेल्या दोन सिलेंडरने तो ओढा.' असा सल्ला ते या व्हिडिओत देतांना दिसतात.


ज्या कोरोना बाधितांची ऑक्सिजन पातळी ही 60 पर्यंत आलेली आहे, ही पातळी प्राणायाम केल्याने 98 पर्यंत वाढवता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. पण हे कितपत बरोबर आहे, हे रामदेव बाबांनाच माहिती.


रामदेव बाबा यांनी केलेल्या या विधानांमुळे अनेकांनी तुमच्या आधीच्या दाव्याचा काय झालं, असे याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तो दावा म्हणजे, कोरोनील या औषधाचा. 


प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी तर आपल्या ट्विटद्वारे कोरोनील या औषधाची कोणीच अर्जंट मागणी करत नसल्याचं सांगत, खिल्ली उडवली आहे. 



मागील वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोनावर कुठलं औषध किंवा लस मिळेल का, यासाठी प्रतिक्षा करत असतानांच रामदेव बाबा यांनी मोठा खुलासा केला. 23 जून 2020 रोजी पतंजलीने कोरोना विषाणूचा संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध सोडल्याचा दावा केला. त्याचंच नाव होतं कोरोनील. 


पण सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या या औषधाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. त्याचबरोबर या औषधीचे नाव आणि त्यातील समाविष्ट घटकांबद्दल माहिती देण्याचं पतंजलीला सांगण्यात आलं. सोबतच या औषधीच्या जाहिरातींवर देखील बंदी घालण्यात आली. यासोबतच एक चौकशी नेमून हे औषध ताबडतोब बंद करण्यात आलं.


याउलट पतंजलीने मात्र हे औषध फक्त प्रतिकारशक्ती वाढविण्याचे असल्याचा दावा करत, यातून पळ काढला. आणि या औषधाला पुन्हा परवानगी मिळवून दिली. सोबतच पतंजलीने स्पष्ट केलं की, जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या देखरेखीत 95 लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली. 


या औषधाच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार पतंजली विरोधात दाखल करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये तर मद्रास उच्च न्यायालयाकडून पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. त्यासोबतच कोरोनील हे औषध फक्त सर्दी, खोकला, आणि ताप यासाठीच उपयुक्त आहे, हे स्पष्ट करण्यात आले होते.


परंतु सहा महिन्यानंतर रामदेव बाबांनी पुन्हा एकदा 19 फेब्रुवारी 2021 ला कोरोनील, नव्याने बाजारात आणलं. आणि मागील वेळेस प्रमाणे या वेळी कुठलाही घोळ होऊ नये, यासाठी रामदेवबाबांनी चक्क देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना व्यासपीठावर आणलं. 


यावेळी रामदेवबाबांनी दावा केला की, कोरोनील हे कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त आहे. परंतु यावरून डॉक्टर हर्षवर्धन यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतरत्र सर्व असोसिएशनकडून प्रचंड टीकाही केल्या गेली.


या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे ट्विट, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे करण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा या औषधावर बंदी घातली.


परंतू महाराष्ट्रात या औषधावर जरी बंदी आलेली असली, तरी हे औषध इतरत्र काही प्रमाणात सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत हे औषध आऊट ऑफ स्टॉक असल्याचेही सांगण्यात येत आहे. 


फोबर्स ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इंग्लंड या देशात भारतीय लोक मोठ्या प्रमाणात ॲमेझॉन या साइटवरून हे औषध ऑर्डर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 



यातील विशेष बाब म्हणजे, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या या औषधाला अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाची कुठलीही मान्यता नाही. याशिवाय या औषधावर याचा उद्देश उपचार किंवा संरक्षण नाही, असंही लिहिण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनीलचं भविष्य काय आहे, हे फक्त पतंजलीच सांगू शकेल.

Post a Comment

0 Comments