Ticker

6/recent/ticker-posts

पृथ्वी सध्या पॉझिटीव्ह होतेय!

vidarbhadoot akola
प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. कोणत्याही घडणा-या घटनेचा दोहींनी बाजूनी विचार करता येतो. आज संपूर्ण जगात वाढत जाणा-या मृत्यूच्या प्रमाणानुसार कोरोनाची दहशत सुध्दा वाढत आहे. प्रत्येक गोष्ट आपण पॉझिटिव्ह घेतली पाहिजे असे नेहमीच म्हणत असतो. कारण त्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो. पण सध्या कोरोनाच्या थैमानामुळे निगेटिव्ह या शब्दाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आज प्रत्येक जण आपल्या निगेटिव्ह असण्याचीच प्रार्थना करीत आहे आणि ती योग्यच आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये माणसाचे अतोनात हाल होत असतात. कारण नैसर्गिक आपत्तीवर मानवाचे नियंत्रण नसते. कोरोनाला मानवनिर्मित आपत्ती म्हणावे की नैसर्गिक आपत्ती म्हणावे हाही एक फार मोठा प्रश्नच आहे. या आपत्तीतून भारत नव्हे तर संपूर्ण जग लवकरात लवकर बाहेर पडावे हीच मनस्वी इच्छा. आज जवळपास संपूर्ण जगातील औदयोगिकीकरण, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण ठप्प पडले आहे. संपूर्ण मानवजात आज आपल्या घरटयात बंदिस्त झालेली दिसून येत आहे. कारण त्याशिवाय कोरोनाविरूध्द विजय मिळविता येणार नाही. आज फक्त मनमुराद संचार करीत आहेत ते फक्त प्राणी आणि पक्षी. त्यांच्याकडे बघितल्यावर असे वाटते की पृथ्वी स्वत: ला अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करीत आहे का ? लॉकडाउन हे प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणारे आहे. कोणालाही ते नकोसेच आहे. पण याच लॉकडाउन मुळे आज हवेची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे दम्याचे, हदयविकाराचे आणि फु फ्फु साचे आजार सुध्दा कमी होत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये दिल्ली आणि मुंबईचे नाव घेतल्या जाते. वायू गुणवत्ता आणि हवामान अंदाज संशोधन  प्रणालीनुसार मुंबई आणि पुणे येथे अंदाजे 45 टक्के तर अहमदाबादमध्ये प्रदूषणाचे 50 टक्के प्रमाण कमी झाले आहे. अनेक देशामध्ये तर कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड यांचे प्रमाण तब्बल 40 टक्कयांनी कमी झाले आहे. अर्थात लॉकडाउन संपल्यावर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होणार आहे हे नक्की. पण पृथ्वीला संजीवनी देण्यास पोषक ठरणारी ही गोष्ट आहे . भारतीय पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या केअर फ ॉर एअर या संस्थेच्या सहसंस्थापक ज्योती पांडे - लवकरे यांनी सांगितले आहे की, मी गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीत असे निळे आभाळ पाहिले नाही. उत्तर भारतातील नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या शहरातून प्रथमच हिमालय पर्वतरांगाचे दृश्य पाहिले आहे. हरिव्दारमध्ये गंगा, तिच्या उपनद्या, यमुना आणि हिंडन या नदयातील पाण्याच्या गुणवत्तेत 40 - 50 टक्के सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. पाणी इतके स्वच्छ झाले आहे की नदीचा तळ हा आपल्या डोळयांनी सुध्दा दिसत आहे. याच नदीला स्वच्छ करण्यासाठी केंद्रसरकारने अनेक योजना आखल्या. पाण्यासारखा पैसा ओतला पण ते सरकारला शक्य झाले नाही. ते या लॉकडाउनने करून दाखविले आहे कारण औदयोगिक कचरा खूप कमी झाला आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या पाण्यातील प्रदूषणाची पातळी कमी झाल्यामुळे भरदुपारी माश्यांचा मुक्तसंचार सुध्दा दिसून येत आहे. सूर्याची प्रखर अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याचे काम ओझोन वायू करत असतो. या प्रखर अतिनील किरणापासून डोळयांचे आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. वायू प्रदूषणामुळे या ओझोन वायूला मोठयाप्रमाणावर भगदाड पडल्याचे दिसून आले होते. ते आता वेगाने सुधारते आहे. हीसुध्दा पृथ्वीसाठी एक सकारात्मक आणि आनंदाची बातमीच नव्हे का? पृथ्वी ही आपली माता आहे. या मातेच्या पोटातील पाण्याचे साठे शोधून मानव आपल्या पाण्याच्या गरजा पूर्ण करीत असतो. प्रामुख्याने एप्रिल आणि मे या महिन्यात बोअर वेल आणि विहीरी तयार करण्याच्या कामांना गती येत असते. पृथ्वीच्या हदयात पाडली जाणारी छिद्रे ही मानवासाठी आणि निर्सगासाठी सुध्दा अत्यंत धोकादायकच असतात. त्याला सुध्दा याच कोरोनाने आळा घातला आहे की जे कोणत्याही शासनाला आवरणे शक्य नव्हते. आज संपूर्ण मानवप्राणी हा घरात बंदिस्त झाल्यामुळे जंगली प्राण्याचा मुक्त संचार सुरू आहे कधी नव्हे ते प्राणी आज शहरी भागातील रस्त्यावर दिसत आहे. इडुक्कीच्या मुन्नारमध्ये तर हत्तीसारखे प्राणी शहरातील रस्त्यावरून संचार करताना दिसत आहे. जयपूरमधील हसनपुरातील एनबीसी कॉलनीमध्ये एक बिजू म्हणजे पाम सिवेट या प्राण्याला मुक्त संचार करताना लोकांनी पाहिले आहे. अशीच परिस्थिती जंगलाजवळील सर्वच भागात दिसून येत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील शाळेच्या मैदानावर टर्की हे प्राणी खेळत असल्याचे दिसत आहे. सॅन फ्रॉन्सिकोच्या रस्त्यावर कोयोरे प्राणी दिसत आहेत. खरच जणू काही प्राण्याचे अच्छे दिन सुरू झाल्याचे जाणवते आहे. कोठेही वाहनांचे आवाज नाही की मानवाची वर्दळ नाही. त्यामुळे त्यांनाही आज जगण्याचा मनमुराद आनंद घेता येत आहे. पर्यायाने त्यांच्याही आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसतो आहे.. या सृष्टीवरील सगळयात बुध्दिमान प्राणी म्हणून मानवाकडे पाहिल्या जाते. त्यामुळे त्याने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. पण कोरोनाच्या विषाणूमुळे आज मानवालाच घरात राहणे अपरिहार्य बनले आहे. परंतु सृष्टीतील सगळे प्राणी , पक्षी आणि नदी-नाले झाडेझुडपे हे मनमुरादपणे डोलत आहेत. आनंद घेत आहे. त्यांच्या अस्तित्वासाठी ही एक फार मोठी संधी चालून आलेली आहे. या संधीचा निर्सगातील मानव सोडून इतर सर्वच घटक नक्कीच फायदा घेतील यात शंका नाही. या सर्व घटकांचा विकास होणे त्यांचे अस्तित्व टिकून राहणे हे सुध्दा मानवासाठी अत्यंत गरजेचे आहे. शेवटी महात्मा गांधीजीनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. पृथ्वी हजारो लोकांच्या गरजा सहज पूर्ण करू शकते पण एकाही माणसाची हाव पूर्ण करू शकत नाही. म्हणून सर्व घटकांचा सदुपयोग करण्याची बुद्धी मानवाला प्राप्त झाली पाहिजे. नाही तर पुन्हा एखादे कोरोनासारखे संकट आपल्यावर आल्यावाचून राहणार नाही. कोरानाच्या पॉझिटीव्हीटीमुळे पृथ्वीवरील निगेटिव्ह आघात कमी होत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. 
सुनील सिताराम कानडजे आर. एस. पी. अधिकारी, तालुका समादेश बुलडाणा. 
मो.क्र. ९४२२ ९३ ०८९६

Post a Comment

0 Comments