Ticker

6/recent/ticker-posts

...अखेर अवघड वाट, वहीवाट झाली !

vidarbhadoot logo
 साप्ताहिक 'विदर्भदूतचा पहिला अंक १८ जुलै १०१२ ला प्रकाशित झाला, आणि 'विदर्भदूतची वाटचाल सुरु झाली. घरातल्यांनी, जवळच्या मित्रांनी सल्ला दिला की साप्ताहिकाचा नाद सोड. त्याला कारणही तसेच होते. कारण साप्ताहिकांकडे पाहण्याचा वाचकांचा दृष्टीकोन बदलला आहे. सोबतच मला अभिमान वाटतो सांगायला, की माझी पत्रकारितेची सुरुवात मुळात दैनिक देशोन्नती अकोल्यावरुन प्रशिक्षणार्थी उप संपादक, नंतर उप संपादक म्हणून झाली. तेथूनच पत्रकारितेला सुरुवात झाली. दैनिक देशोन्नतीचे तत्कालीन कार्यकारी संपादक आदरणीय रवि टाले सरांनी अगदी बोट धरुन पत्रकारितेची ओळख करुन दिली. शिकवण दिली, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. 

 त्यांनतर यवतमाळ येथून नव्याने प्रकाशित झालेल्या दैनिक 'जनसामथ्र्य मध्ये उप संपादक म्हणून रुजू झालो. कार्यकारी संपादक म्हणून तेथे होते आदरणीय चंद्रकांत वानखडे सर. 'चंद्रकांत वानखडे हे नाव केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला परिचीत. शेती आणि शेतकरी भाऊंचा आत्मा. त्यामुळे साहजिकच शासन असो की प्रशासन भाऊंना दचकून असायचे, कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शेती-माती आणि शेतीत राबणा:या लाखो-करोडो माय बापांसाठी निस्वार्थपणे वाहिलेलं. भाऊंनी आपल्या आयुष्यात थोडा जरी स्वार्थ जवळपास फिरकू दिला असता, तर आज त्यांच्या नावासमोर विद्यमान किंवा माजी कृषीमंत्री, सहकार मंत्री, इतरही पदं नक्कीच चिकटलेली असती; परंतु भाऊनी दूर-दूर पर्यंत स्वार्थ जवळ येऊ दिला नाही, की त्याची कधी आशाही केली नाही. 

 त्या काळातील (सन २००९) राजकीय पक्षांची आघाडीची नेतेमंडळी, तत्कालीन मंत्री जर यवतमाळला दौ:यावर आले तर भाऊंसोबत अगदी शेतातीत मातीवर बसून तासभर तरी गप्पा करायचे, आणि सोबत आसायचे मी आणि त्या काळातील माझा सहकारी मित्र, जणू मोठा भाऊ दिलीप ब्राम्हणे. भाऊंचा एवढा अफाट जनसंपर्क असल्यामुळे सहाजिकच भाऊंची थोडी-भिती वाटायची, दडपण यायचं. पण त्यानंतर अगदी थोड्याच दिवसात ती दहशत, दडपण भाऊंनीच संपविले. कामाला झपाट्याने सुरुवात झाली. काम करता-करता आमच्यासाठी 'सर असणारे भाऊ 'चंदूभाऊ कधी झाले हे आम्हालाच कळले नाही. अगदी 'पोटच्या पोरासारखं भाऊ प्रेम करायला लागले, काम करता-करता शिकवायला लागले. मला अभिमान वाटतो सांगायला की उभ्या महाराष्ट्रात 'चंदुभाऊंना 'बापमाणूस मानणारे शेकडो जण आहेत. 

 या सर्वांना 'चंदुभाऊंची शिकवन ही 'बापासारखीच आहे. असो, 'नैतिक पत्रकारिता, 'उच्च पातळीचे लिखाण हाच बाणा असणा:या देशभरातील पत्रकार मंडळीचा सहवास, शिकवण आम्हाला द्यायला लागले. यामध्ये उल्लेख करायचा तर अगदी नागपुरच्या श्रीपाद जोशी सरांपासून ते थेट दिल्लीच्या पी. साईनाथ सरांपर्यंत, यामध्ये नावे घ्यायची झाली तर अशी बरीच आदरणीय नावे आहेत. ही सर्व मंडळी यवतमाळच्या कार्यालयात यायची तासनं-तास गप्पा करायची आणि विशेष म्हणजे या गप्पांमध्ये दिलीप ब्राम्हणे आणि मला 'चंदुभाऊ सहभागी करुन घ्यायचे. एकप्रकारे हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ होता, असेच म्हणावे लागेल. चंदुभाऊ आरामदाई खूर्ची आणि एसीमध्ये कधीच रमले नाही, त्यामुळे भाऊंचा प्रत्यक्ष सहवास त्यानंतर फार काळ लाभला नाही. पुन्हा 'चंदुभाऊ शेती-माती आणि सक्रीय आंदोलनाकडे गेले; परंतु शिकवन मात्र आजही तशीच सुरु आहे. 

    पुढच्या काळात 'चंदुभाऊ नागपूरला गेल्यानंतर दै. जनसामथ्र्यही फार काळ टिकले नाही, वृत्तपत्रच बंद झाले. मग नंतर दैनिक मातृभूमि अमरावतीला उपसंपादक म्हणून काम सुरु केले. आदरणीय संपादक अनिलभाऊ अग्रवाल यांच्या तालमीत 'नाविन्यपूर्ण शिकवन मिळायला लागली, विशेष काम करायची संधी मिळायला लागली. भाऊंनी त्यानंतर मुख्य उप संपादकाचीच जबाबदारी दिली. बारा ते सोळा पानांचा बहुरंगी अंक तयार करता-करता पत्रकारितेतील विविध चांगले रंग जवळून पाहता आले, शिकता आले. आदरणीय अनिलभाऊ त्यावेळी पत्रकारांची देशातील सर्वोच्च संघटना असलेल्या 'प्रेस कौन्सील ऑफ इंडीयाचे सदस्य होते, की ज्या संघटनेचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायमूर्ती असतात. त्यामुळे अनिलभाऊंची व्याख्यानं देशभरात होत असायची, नामांकीत विद्यापीठांमध्ये भाऊंना बोलावले जायचे. या सर्वांनमधून पत्रकारितेचे विविध बारकावे लक्षात यायला लागले, शिकता आले.

          त्यानंतर वर्ष २०१२ ला 'दोनाचे-चार हात झाले. घरच्यांचा दबाव यायला की 'सकाळी दहाला गेला की रात्रीच्या बारालाच घरी येतो, ही 'बेटाईम नोकरी सोड व घरी ये, शेती कर, यापेक्षा जास्त कमावल्या जाईल. वखर हाण, तेवढाच आम्हालाही हातभार. त्यांच्या बोलण्याचा रोष माझ्या लक्षात यायचा, त्याला कारणही तसेच होते, मिळणारा तुटपूंजा पगार!

       अशाप्रकारे सर्व घटना घडत गेल्याने माझे पितृतुल्य गुरुवर्य आदणीय प्राचार्य डॉ. अनिल कोरपेनवार सर, योगेश आरस, ज्ञानेश पाखरे सर, संतोष धरमकर, भागवत मुठ्ठे, संदीप शेंडे, विश्वनाथ वाघ सर,  संजय टेकाळे सर माझे थोरलेे मामा अॅड. शेषराव काळे, धाकले मामा अॅड. श्याम काळे, तुषार काचकुरे, प्रा. युवराज लोखंडे सर,  या सर्व (अशा जीवाभावाच्या मंडीळीची यादी बरीच मोठी आहे, सर्व नावे लिहणे येथे लिहणे शक्य नाही.)आदरणीय मंडळींच्या विचारातून 'विदर्भदूतची १८ जुलै २०१२ निर्मीती झाली, प्रकाशन झाले. त्यानंतर अमरावती विभागातील सर्व आदरणीय जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयांनी मोलाचे मार्गदर्शन केले. बुलडाण्याचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी आदरणीय गुरुवर्य प्रशांत दैठणकर सरांनी तर, मी आर्थिक अडचणीत आल्यावर साप्ताहिक बंद करायला विचार करीत असतांना खूप मदत केली. दैठणकर सरांसारखा बराच मोठा अधिकारी वर्ग आहे, परंतु या सर्व आदरणीय अधिकारी मंडळींचा नामोल्लेख शक्य नाही. या सर्वांचा कायम मी आभारी आहे.

          'विदर्भदूतच्या प्रकाशनानंतर मोठा आधार मला मिळाला तो, रक्तापेक्षा मोठ्या नात्याची माझी मोठी बहीण यामिनीताई, योगेशदादा यांचा. प्रत्येक वेळी खचल्यानंतर या दोघांनी मला उभारी दिली, वास्तविक बळ दिलं. आणि म्हणूनच 'विदर्भदूत आजही सुरुच आहे. कारण नियतकालीक कोणतेही असो, त्याची स्थापना करणे आणि चालविणे म्हणजे 'आर्थिक आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे, ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. आपण सर्व मंडळींनी मोलाचा आधार दिला म्हणूनच मी आणि 'विदर्भदूत आजही उभे आहोत, टिकून आहोत.

         अलिकडच्या काळात जगाच्या उत्पत्तीपासून कधीच न आलेलं महाभयंकर 'कोरोना नावाचं भयावह संकट आज जगावर आलं. समजाव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्र या 'कोरोनाने 'गारद केलं, मोडून पाडलं. वृत्तपत्रसृष्टीला तर मोठा फटका यामध्ये बसला. अनेक आघाडीच्या दैनिकांनी आपल्या आवृत्त्या गुढाळायला सुरुवात केली, कर्मचारी, पत्रकार बेरोजगार झाले. सर्वच साप्ताहिकांची स्थिती अत्यंत दयणीय आहे. सर्वंच क्षेत्रांमध्ये आरोग्यसह आर्थिक व्यवस्थेवर आजवरचा सर्वात मोठा एकप्रकारे म्हणता येईल की 'जीवाणू बॉम्ब हल्ला झाला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नुकतेच ११ जुलैपासून साप्ताहिक 'विदर्भदूतने विदर्भदूत न्यूज नावाने संपूर्ण ऑनलाईन युट्यूब पोर्टल, युट्यूब चॅनल सुरु केले आहे. त्यालाही आपण मोठ्या मनाने स्वीकाराल अशी अपेक्षा करतो. १८ जुलै २०२० ला विदर्भदूला ८ वर्ष पूर्ण झालीत. नवव्या वर्षातील पहीला अंक आपल्या हाती देत असतांना नक्कीच आनंद होत आहे. यापुढेही आपण कायम 'विदर्भदूत वाचत रहाल, आता ऑनलाईनही पहात रहाल, ही अपेक्षा करतो व शेवटी सर्व वाचक, वितरक, जाहिरातदार, हितचिंतक व अहितचिंतकांचेही आभार मानतो. आता सांगावेसे वाटते की  कायम अवघड वाटणारी वाट आता वहीवाट झाली आहे. धन्यवाद!

संजय भगवानराव निकस पाटील

Post a Comment

0 Comments