Ticker

6/recent/ticker-posts

श्रीरामप्रभुंच्या अवतारकार्यातून प्रेरणा घ्यावी...तरच आपण रामभक्त होऊ शकतो!

Shri Ram in Ram Mandir Ayodhya


श्रीरामप्रभुंना संपूर्ण आयुष्यात अनेक वाद-विवादांना, आरोप-प्रत्यारोपांना तोंड द्यावे लागले, ही पौराणिक वस्तुस्थिती आहे. तरीही श्रीरामप्रभुंनी आयुष्यात कधीही आपली नितिमत्ता, नैतिकता आणि वैचारिक तत्वनिष्ठता ढळू दिली नाही, की आपल्या ध्येयापासून विचलीत झाले नाहीत, हे पुरणात, रामायनामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. त्यांचे अवतारकार्य संपल्यानंतर अलिकडच्या काळापर्यत आयोध्येतील त्यांच्या मंदिर निर्माणावरुनही अनेक पातळीवर न्यायालयीन डावपेचनिर्माण झालेत आणि शेवटी सन्मानणीय सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू लक्षात घेऊन न्याय दिला.

या मिळालेल्या न्यायाचे देशासह जगभरात असलेल्या भारतीय बांधवांनी स्वागत केले. पुढे तयारी सुरु राम मंदीर निर्माणाची. आणि पाहता-पाहता राम मंदिराच्या पायभारणीचा दिवस आज उजाडला. देशाचे सन्मानणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते, साधु-संत, महंतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देश या सोहळ्याला 'याची देही याची डोळा' वृत्तवाहिन्यांवर पाहणार आहे. आणि आता श्रीरामांचे भव्य-दिव्य, तेजस्वी मंदीर उभे राहणार आहे. ही नक्कीच समस्त भारतवर्षासाठी गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. दिवाळसणापेक्षाही मोठा दिवस हा सर्वांसाठी राहणार आहे. रामभक्तांना आता आयोध्येत जाऊन श्रीरामप्रभुंच्या चरणी लीन होता येणार आहे. या सर्व गोष्टींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण भारताच्या इतिहासात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२० हा दिवस कायम सुवर्णाक्षरात कोरल्या जाणार आहे. एवढेच काय तर अनादी-अनंत काळापर्यंत या दिवसाचे स्मरण रहावे म्हणून टाईम कॅप्सूलचे सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकुणच हा सोहळा आणि 'मंदीर निर्माण एकमेवाव्दितीय राहणार आहे.

श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवे अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. श्रीराम जन्माला आले ती वेळ मध्यान्हीची होती. नक्षत्र पुनर्वसू होते. लंकाधिपती रावणाने घोर तपश्चर्या करून अनेक वरदान मिळवले होते. त्यामुळे गर्विष्ठ झालेला रावण मन मानेल तसे वागत होता. कोणत्याही देवाच्या हातून मृत्यू येणार नाही, असे त्याला वरदान होते. अशा उन्मुक्त रावणाचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूच मानव रुपात अवतरला, तो अवतार म्हणजेच रामांचा. श्रीराम आदर्श पुत्र होते. श्रीरामप्रभुंनी आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.


श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता.  श्रीराम हे आदर्श शत्रूसुद्धा होते.  श्रीरामप्रभुंनी धर्माच्या, राजकारणाच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांवरून दिसून येते. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरुष 'उत्तम कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला 'मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात. आपल्या कृतीमध्ये, आचार-विचारांनामध्ये आणायला हव्यात.

आता राम मंदीर उभे राहणार आहे. श्रीरामप्रभुंचे आयोध्येत गेल्यानंतर साक्षात दर्शन होणार आहे. पण खरी जबाबदारी येथून पुढे समस्त भारतवासियांची राहणार आहे. कारण आपण कुण्या साध्या-सुध्या देवाच्या, व्यक्तीच्या, पायावर डोके ठेवत नाही, तर साक्षात 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या पायांवर डोके ठेवणार आहोत, याचाही विचार आपण करायला हवाय. श्रीरामांचे आचार विचार आपल्यामध्ये निर्माण कसे होतील यावर भर द्यायला हवाय! कारण  श्रीरामप्रभुंनी संपूर्ण आयुष्यात त्यांच्या अवतारकार्यात अनितीला, गैरवर्तनाला, पोकळ आणि खोट्या आश्वासनांना, फोल वचनांना दूर-दूर पर्यंतसुद्धा फिरकू दिले नाही, जवळ येऊ दिले नाही. आणि आज आपण अशा या महान श्रीरामप्रभुंच्या पायांवर डोके ठेवणार आहोत, त्यामुळे जर काही वाईट प्रवृत्ती आपल्या अंतकरणात असतील तर अशा गोष्टी गंगांर्पण करायला पाहिजेत.

दर्शन घेतेवेळी असा संकल्प करायला पाहीजे. तरच आपण ख:या अर्थाने  श्रीरामप्रभुंचे भक्त ठरु शकणार आहोत. नाहीतर उदो-उदो करायला श्रीरामप्रभुंचा, आव आणायचा रामभक्त असल्याचा आणि वागणूक मात्र वेगळी असे व्हायला नको. श्रीरामांनी वचनं दिली तर ती वचनं पाळण्यासाठी सर्वातोपरी पयत्न केले आणि वचनं पूर्णत्वास नेली. आपण दिवसभरात किती जणांना, किती-किती वचनं देत फिरतो, किती वचंनाचे पालन करतो, याचाही आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला थोडसं हलवून तपास करणे आवश्यक आहे. तरच आपण खरे श्रीराम भक्त ठरणार आहोत. आपण ख:या अर्थाने राम अवतार कार्य आचार-विचारांमध्ये आणले तर आपण 'राम विचारांची वाट चालत आहोत, असे म्हणता येईल. त्यामुळे समस्त भारतसियांनी श्रीरामप्र्रभुंच्या अवतारकार्यातून प्रेरणा घ्यावी, आणि आयुष्याची उत्तम वाटचाल करावी, तरच आपण 'रामभक्त ठरणार आहोत!

Post a Comment

0 Comments