Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव ट्रकने युवकाला चिरडले

 


आलेगाव येथील अमोल महल्ले यांचा जागीच मृत्यू – बाभुळगाव येथे अपघात

पातुर: भरधाव वेगात आलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला चिरडल्याची दुर्घटना पातुर तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली. या अपघातात आलेगाव येथील अमोल अशोक महल्ले (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला.

अमोल महल्ले यांची पत्नी वाडेगाव येथील माहेरवाशीण आहे. पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी अमोल हा मंगळवारी दुपारी आलेगाववरून वाडेगावकडे निघाला होता. बाभुळगाव येथे वाडेगावकडे जाणाऱ्या गाडीत बसण्यासाठी तो रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली येऊन अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा देह चिरडल्यासारखा झाला.

घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरिय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

अमोल महल्ले यांच्या अचानक निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील असा परिवार आहे. कर्ता पुरुष गेल्याने महल्ले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातानंतर बाभुळगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या वेगवान वाहनांमुळे या भागात अपघातांची मालिका सुरू असून, रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments