Ticker

6/recent/ticker-posts

खासदारांच्या सुमार कामगिरीने विकास खल्लास

 नवनीत राणा यांनी लोकसभेत विचारले अवघे ५५  प्रश्न

dilip yedatkar Vidarbhadoot Buldhana


काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांचा आरोप


अमरावतीलोकसभेत प्रश्न विचारणार्‍या खासदारांच्या यादीत अमरावतीच्या भाजपप्रणीत खासदार नवनीत राणा यांनी शेवटचा दुसरा क्रमांक पटकावला.  भाजपचेच सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर यांचा शेवटून पहिला क्रमांक आहे. विकासाचा प्रचंड आव आणणाऱ्या नवनीत राणा यांची लोकसभेतील सुमार कामगिरी अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. खासदार नवनीत राणा यांनी नसते उद्योग करण्याऐवजी आता मतदारसंघाच्या विकासासाठी लोकसभेत तोंड उघडावे,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अड. दिलीप एडतकर यांनी केले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत आपल्या  आजपर्यंतच्या कारकिर्दीत अवघे  ५५  प्रश्न विचारले आहेत. सभागृहातील चर्चेत त्या ५६ वेळा "सामील" झाल्या आहेत.  संबंधित ५५  प्रश्न आणि ५६ चर्चामध्ये विकासाऐवजी पंतप्रधान मोदींचे गुणगान, भाजप सरकारचे समर्थन आणि काँग्रेसवर आगपाखड या अनावश्यक बाबींचा त्यात समावेश आहे. विकासाच्या व लोकांच्या प्रश्नावर त्या फार कमी बोलल्या, असा थेट आरोप ॲड.दिलीप एडतकर यांनी केला आहे. त्यांच्या या दोन वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी एकही खाजगी विधेयक लोकसभेत मांडलेले नाही . सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी यांनी तर केवळ ३१ प्रश्न विचारून सभागृहात शेवटून पहिला क्रमांक मिळवला आहे . गंमत म्हणजे शेवटून पहिला व दुसरा क्रमांक पटकावणाऱे   हे दोन्ही खासदार "जात चोरून" राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या दोघांविरुद्ध उच्च न्यायालयांनी  मागासवर्गीय नसल्याचा निर्णय दिलेला आहे, असे नमूद करून त्यांच्या जातीवर सर्वोच्च न्यायालयाचा अंतीम निर्णय येईपर्यंत तरी त्यांनी विकासासाठी आपले तोंड उघडावे, असे  एडतकर यांनी म्हटले आहे.

सभागृहाच्या बाहेर विकासाच्या बाबतीत वायफळ बडबड करणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकसभेत आपले तोंड केवळ भाजपला समर्थन देण्यासाठी किंवा काँग्रेस, सेना,  राष्ट्रवादीवर आगपाखड करण्यासाठीच उघडल्याचे त्यांच्या लोकसभेतील सुमार कामगिरीवरून सिद्ध होते. याउलट खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेतील कामगिरी अत्यंत उजळ आहे. त्यांनी तब्बल ४०२ प्रश्न विचारले, ६३ चर्चामध्ये सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर ८ खाजगी विधेयक त्यांनी मांडली.  त्याखालोखाल राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ३९७  प्रश्न विचारून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रवादीचे श्रीरंग बारणे यांनी ४०५  प्रश्न विचारून पहिला क्रमांक मिळविला आहे.

 लोकसभेतील या सर्वांचे अनुकरण नवनीत राणा यांनी करावे. केवळ प्रसिद्धीसाठी लोकसभा सभागृहात मोजके व बाहेर नको तितके बोलणे आणि लोकसभेत केवळ शासकीय विधेयकांच्या चर्चांमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीसाठी बोलणे म्हणजे कामगिरी नव्हे याची जाणीव खासदार नवनीत राणा यांनी ठेवावी, असे दिलीप एडतकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments