Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील सावळी ग्रामपंचायत विभागातून प्रथम

 


संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा


अजिसपुरला सांडपाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार 


 बुलडाणा- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातून बुलडाणा तालुक्यातील सावळी ग्रामपंचायतीन अमरावती विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे कुशल मार्गदर्शनात जिल्ह्याच्या यशात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत गेल्या चार वर्षापासून अमरावती विभागातून ग्रामपंचायत प्रथम येत आहे विशेष.

  स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून गावाने आपला विकास साधावा यासाठी संपूर्ण राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान गेल्या अनेक वर्षापासून राबविले जात आहे. यामध्ये सन २०१९-२० या वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पत्र ता. ४ रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धत जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातून सावळी ग्रामपंचायतीने नेत्रदिपक कामगिरी करत अमरावती विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. विभागासाठी 10 लक्ष रुपये व प्रमाणपत्र असा पुरस्कार सावळी ग्रामपंचायतीस मिळणार आहे. आता सावळी ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमासाठी २५ लक्ष रुपये व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. याच स्पर्धेत  बुलडाणा तालुक्यातील अजिसपुर या ग्रामपंचायतीने सुध्दा सांडपाणी व्यवस्थापनात विशेष असा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार मिळविला आहे.

   सावळी  गावात ४०७ कुटुंब संख्या व १८५० लोकसंख्या असून ग्रामस्थांच्या एकजुटीने स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आज रोजी गावात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा असून त्यांचा नियमित वापर करतात. गावात २ सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. गावात कच-याचे योग्य व्यवस्थापन होणेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची स्वतंत्र घंटागाडी असून त्याद्वारे नियमित कचरा संकलित केला जातो. गावातच कचरा डेपी, कंपोस्ट पिट, गांडुळ खत प्रकल्प,  सांडपाणी व्यवस्थापनातर्गत गावात भूमिगत गटारे असून गावात कुठेही उघड्यावर सांडपाणी दिसत नाही. तसेच गावात शोषखड्डे, मॅजिक पिट, पाण्याचे स्थिरीकरण तळे, व्यायाम शाळा आर. ओ. प्रकल्प, गरम पाण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, सुसज्य असे आरोग्य उपकेंद्र अशा उल्लेखनीय बाबी गावात आहेत. तसेच गावानेच लोकवर्गणीद्वारे गावातील प्राथमिक शाळा ही डीजीटल शाळा केलेली आहे. 

ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज हे पेपरलेस आहे अशा एक ना अनेक सुविधांनी सज्ज ही ग्रामपंचायत म्हणजे जणू स्वच्छतेचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेली आहे.

   सावळी व अजिसपुर या ग्रामपंचायतीने केलेल्या या कामगिरीने निश्चितच बुलडाणा जिल्ह्याने स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे अशी प्रतिक्रीया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार व उपाध्यक्ष सौ. कमलताई बुधवत यांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीचे त्यांनी अभिनंदन केले असून जिल्ह्यातील  इतर ग्रामपंचायतीनी सुद्धा  या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

   सावळी ग्रामपंचायतीची कामगिरी
- २०१७-१८ मध्ये तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम 
- सन २०१८-१९ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुकास्तरीय प्रथम व जिल्हास्तर द्वितीय
- सन २०१९-२० संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरावर द्वितीय 
- २०१७-१८ मध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड मध्ये सो ताराबाई वाघ पर्यावरण रत्न सरपंच म्हणून सन्मानित 
- सन 2018-19 मध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड मध्ये सौ. सविता तेजराव नरवाडे पर्यावरण रत्न सरपंच म्हणून सन्मानित
 सावळी ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेत सुध्दा या ग्रामपंचायतीने याच जिद्दीने प्रयत्न करत यश प्राप्त करावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments