Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संकटात 1000 विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात ; शाळा मालकांनी वर्षभराची फी केली माफ




मुंबई | कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांना आर्थिक फटका बसल्याने शाळेची फी भरणे देखील कठीण झाले. अनेक विद्यार्थ्यांना शाळेची फी भरता येत नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे देखील बंद झाले.


याच पार्श्वभूमीवर होली स्टार या इंग्रजी शाळेच्या तरुण मालकांनी आपल्या शाळेतील 65 टक्के विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षभराची फी माफ केल्याची कौतुकास्पद बातमी समोर येत आहे.


कोरोनाचे संकट असतांना, खाजगी शाळांकडून एक रुपया सुद्धा फी माफ केली जात नसतांना मालाड-मालवणी भागातील होली स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आणि मालक 35 वर्षीय हुसैन शेख यांनी आपल्या 1500 विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थ्यांची वर्षभरासाठी शाळेची फी माफ केली आहे. 


आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या मुलांचे शिक्षण शाळेच्या फीच्या कारणांमुळे अर्धवट राहू नये, यासाठी हुसैन यांनी शिक्षकांशी चर्चा केली व गरजू विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करण्याचा निर्णय घेतला.


याशिवाय उरलेले 500 विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कमीत कमी 15 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. सोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना रेशन किट देखील दिली जात आहे.


आपल्या सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडत, त्यांनी हे प्रेरणादायी कार्य केले आहे. यावर्षी विद्यार्थ्यांकडून फी घेतली नसल्याने, शाळेतील शिक्षकांना पगार देण्यासाठी आणि स्वत:चे घर चालविण्यासाठी हुसैन शेख यांनी बायकोचे दागिने बँकेत गहाण ठेवले आहेत.


विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा विचार करता शाळेतील शिक्षक देखील अर्ध्या पगारात काम करण्यास तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments