Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित



मुंबई | मागील वर्षापासून कोरोना महामारीने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कित्येक निवडणुका लांबणीवर पडल्या असल्याचे चित्र आहे. 


कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे आता राज्यातील पोटनिवडणुका देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.सदन यांनी याबद्दल महिती दिली आहे.


राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषदांतर्गत येणा-या 33 पंचायत समित्यांच्या निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. 


या जिल्ह्यात नागपूर, धुळे, वाशीम, नंदुरबार आणि अकोला येथील जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांच्या 19 जुलैला पोटनिवडणुका पार पडणार होत्या. 


मात्र, कोरोनाचा वाढता धोका बघता राज्य शासनाकडून या निवडणुका स्थगित करण्याची विनंती, राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य शासनाला सविस्तर अहवाल मागण्यात आला होता.


नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, राज्य शासनाने केलेल्या विनंतीचे गांभीर्य लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. यासोबतच आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे.


कोरोनाची स्थिती सुधरल्यानंतर पोटनिवडणूका घेण्यात येतील, असं देखील राज्य सरकारने यावेळी नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments