लग्नाआधीपासून मुलाला टक्कल असल्याची माहिती लपवून आपली फसवणूक केल्याची तक्रार एका नवविवाहीतेने केली आहे. ही तक्रार मिरा रोड येथील नया नगर पोलिस स्थानकामध्ये २९ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या घरच्यांविरोधात दाखल केली आहे. त्यानुसार पतीला टक्कल असल्याची माहिती आरोपीने आणि त्याच्या घरच्यांनी आपल्याला लग्नाआधी दिली नाही असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा चार्टड अकाऊटंट आहे. त्याचे आणि फिर्यादी या दोघांचेही सप्टेंबर महिन्यामध्ये लग्न झाले. त्यानंतर या महिलेला आपल्या पतीला टक्क असून तो विगचा वापर करतो हे लक्षात आले, अशी माहिती नया नगर पोलिस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक कैलास बर्वे यांनी दिली. यासंदर्भात या महिलेने आपल्या सासरी विचारणा केली असता त्यांनी विषय टाळत, माझ्याकडे माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सासरचे लोकं आणि माझ्या पतीला माझ्यावर सशंय असून तो माझ्या मोबाईलमधील चॅट आणि कॉल रेकॉर्डही तपासू शकतो असेही या महिलेने पोलिसांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे पतीने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही आरोप या महिलेने केल्याची माहिती बर्वे यांनी दिली.
तक्रारीनूसार पोलिसांनी या महिलेचा पती आणि त्याच्या पालकांविरोधात कलम ४९८, कलम ३७७, कलम ४0६, कलम ५00, याबरोबरच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून न्यायालयाने पतीने पोलिसांना शरण यावे असे म्हटले आहे.


0 Comments